अतर्क्य ना घडले काही ...

 गेल्या ३-४ महिन्यात २ घटना अशा घडल्या ज्यामुळे असे वाटते कि माणसाला आपण आणि आपले प्रियजन अमरपट्टा घेऊन जन्माला आले  आहे असे वाटते का !

एका घटनेत शाळकरी सोबती आपल्या पत्नी सह मध्यरात्री स्वतः गाडी चालवत येत होता आणि झोप जी काळा प्रमाणे कधी घाला घालेल सांगता येत नाही तशी ती आली आणि भीषण अपघात होऊन तो वाचला पण पत्नी जागीच गेली.  दुसऱ्या एका घटनेत एक लहानगी वरच्या मजल्यावरून पडून गेली. घराच्या मोठ्यांचे थोडेसे  दुर्लक्ष ह्याला कारणीभूत ठरले. दोन्ही वेळा  प्रचंड  हळहळ व्यक्त झाली आणि जे लोक अप्रत्यक्ष जबाबदार होते त्यांना आयुष्यभराचे 'survivor guilt'  लागून राहिले.

कळत नकळत म्हणायचे कि कळतंच आपण सगळे जण अशा चुका करतो.  बरेचदा काहीच होत नाही म्हणून सुरक्षेचे नियम धुडकावून लावतो. काहीवेळा आपल्याला चाहूल लागते सुद्धा कि काही विपरीत घडेल पण सुदैवानी तसे होत नाही आणि आपण पुन्हा बेफिकिरीने वागू लागतो . नियम पाळायच्या बाबतीत आपण भारतीय जरा जास्तीच बेपर्वा आहोत असे जाणवते इतर देशात जाऊन आल्यावर.

मी स्वतः पण त्याला अपवाद नाही. कॉलेज मधली घटना आठवते आहे. सगळ्या मैत्रिणी लोणावळ्याला गेलो होतो फिरायला आणि इथून जाताना लोकल नि गेलो. तरुण वय आणि काहीतरी वेगळे  करायची हौस ह्या नादात लोकल मध्ये दाराशी  बसून पाय खाली सोडले होते आणि स्टेशन दुसऱ्या बाजूनी येणार त्यामुळे ह्या बाजूला पाय सोडून बसलो तरी हरकत काय !  जसे  स्टेशन जवळ यायला लागले तसे बाहेर काही माणसे उभी होती ती ओरडून काहीतरी सांगू लागली... काय वाटलं कुणास ठाऊक पण मी एकदम उठून उभी राहिले आणि दुसऱ्या मिनिटाला लोकल माझ्या बाजूनी स्टेशन ला शिरून प्लॅटफॉर्म ला लागली. माझी धडधड मला नंतर बराच वेळ ऐकू येत होती. मी तशीच बसून राहिले असते तर आज बहुदा माझे दोन्ही पाय ...

गीत रामायणातल्या 'पराधीन आहे जगती' मधले कडवे आठवते 'अतर्क्य ना घडले काही जरी अकस्मात ' .. पण अकस्मात तरी घडत का हे.. नाही, कारण अंतर्मन  आपल्याला सतत काहीतरी सांगत असते पण इतर कोलाहलात आपण ते ऐकत नाही किंवा ऐकू येत नाही. 

Popular posts from this blog

सकाळची शोभा

बागकाम एक आनंद

प्रातःस्मरण