बागकाम एक आनंद

 कुठल्याही छंदात रमून जाणे, तहान भूक हरपून जाणे, कशाचे वेड लागणे वगैरे गोष्टी माझ्या बाबतीत कधी झाल्याचं नाहीत, खूप इच्छा असूनही. पूर्ण केलेल्या छंदांपेक्षा अर्धवट सोडलेले छंद अमाप आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मी एका निष्कर्षाला आले होते कि आपल्याला काही छंद लागणे शक्य नाही किंवा ४ जणांना आहे म्हणून आपल्याला असायलाच हवा असं  हि काही नाही.

माझ्या लहानपणी आमची खूप छान  फुलबाग होती. मोगरा, सायली, गुलाब, शेवंती, झेंडू अशी अनेक फुलझाडे होती. आमचे घर तर फुलांसाठीच ओळखल्या जायचे. बाबा खूप प्रेमानी जोपासायचे आणि मी मात्र सुंदर आलेली फुले तोडून शाळेत बाईंना किंवा आवडत्या मैत्रिणींना देऊन भाव खात असे. पुढे नागपूर सोडून पुण्याला आलो तिथेही गच्चीवर गांडूळखत वापरून बाबानी सुंदर बाग  फुलवली होती आणि लोकं दुरून दुरून पाहायला येत होते. इथे पण माझा सहभाग फोटो काढणे आणि भाव खाणे इतकाच होता. 

पुढे ते घर सोडून फ्लॅट मध्ये आलो आणि अगदी छोटी गच्ची वाट्याला आली. अनेक दिवस काहीच फुलझाडे नव्हती. कधी आणली तर ती कबुतरांनी खराब केली. मग आम्ही बर्ड नेट लावून घेतली आणि बाबानी पुन्हा बागकाम सुरु केले. घरातला तो हिरवा कोपरा मात्र आता सुखावू लागला. दिवसभराच्या घाई गर्दीच्या दिनचर्येत आता मी  सकाळचा चहा मात्र ह्या छोटेखानी बागेतच घेते. संथ गतीने का होईना प्रत्येक झाडात काही ना काही बदल घडत असतो तो पाहायची सवय लागली. झाडांचे ते वेड्या सारखे सूर्याच्या दिशेने झेपावणे गमतीचे वाटते. आज कुंडी फिरवून ठेवली तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा  त्या फांद्या सूर्याच्या दिशेने पाहायला लागतात. फोटोसिन्थेसिस वगैरे शाळेत केलेल्या  पोपटपंची चा प्रत्यक्ष अनुभव घेतला. . हळू हळू प्रत्येक झाडात मन गुंतायला लागले. 

कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यामुळे ज्याला फुले येतात ते बेस्ट आणि ज्याला येत नाहीत ते फारसे चांगले नाही असे ठरवून टाकले. असेच एक गुलाबाचे झाड होते ज्याला खूप दिवस फुलेच येईनात. बाकीच्या गुलाबांना सुंदर सुंदर फुलं येत होती आणि ह्याला काही केल्या येईना. बाबाना म्हंटले पण मी कि कसे हे झाड बेकार, नुसतीच जागा अडवून बसले आहे , पाहू पाहू आणि उपटून टाकू आणि चांगला दुसरा गुलाब आणू. रोज त्या झाडाकडे पाहून हेच म्हणायचे किंवा विचार यायचा. एक दिवस विलक्षण घडले, अचानक त्या झाडाने मान टाकली, पाणी घातले तरी  वाळुनच गेले. आणि मग मात्र माझे मन मला खूप खायला लागले. माझे बोलणे तर झाडाला लागले नाही !! कुठेतरी वाचले होते कि झाडांना पण भावना असतात, त्यांच्याशी प्रेमाने बोलले वागले कि ती बहरतात. आणि तो एक नेहमीच धडा मला मिळाला कि कोणालाही judge करायचे नाही. आणि लगेच write off करायचे नाही. 

ह्याच दरम्यान एक खूप छान आर्टिकल linkein वर वाचायला मिळाले. लेखकाने जो IT मध्ये काम करतो त्याने बागकाम सुरु केले आणि त्या अनुभवांनी त्याला किती समृद्ध केले. त्या लेखाची लिंक इथे देते आहे. 

https://www.linkedin.com/pulse/wonderful-thing-called-gardening-vijay-kulkarni/?trackingId=aDXjd%2Frva5PVWPnnE2wnSg%3D%3D

मलाही हि काहीशी अनुभूती येते आहे. देव करो हा छंद मला असाच समृद्ध करो !


Comments

Popular posts from this blog

सकाळची शोभा

प्रातःस्मरण