ऋणानुबंधाच्या ...

एखादे ठिकाण आपल्याला का आवडत असावे असा विचार करत होते. तिथल्या सृष्टी सौंदर्य मुळे, त्याच्या नाम महात्म्यामुळे  कि आपल्या तिथल्या वास्तव्याच्या सुखद आठवणींमुळे. सगळी कारणे बरोबर असावीत पण कालपरत्वे सृष्टी सौंदर्य फारसे लक्षात राहत नाही पण तिथे भेटलेली माणसं मात्र कायम स्मरणात राहतात. काहींशी तुमचे त्यांच्याशी पूर्वजन्मीचे नाते असावे असे बंध जुळतात.

पहिला परदेश प्रवासाचा अनुभव हा  बराचसा 'दुरून डोंगर साजरे'सदरात  मोडतो. जाताना जेवढा उत्साह असतो तो तिथे प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांनी पार नाहीसा होतो. माझं काहीसे तसेच होता होता राहिले त्याचे कारण अभ्यंकर काका. लंडन मधील पहिला आठवडा भयंकर गेला होता. खाण्याची प्रचंड आबाळ, नवीन वातावरण, राहायची नीट सोय नाही. एक वेळ तर सगळा  गाशा गुंडाळून  परत जावे ह्या विचाराप्रत आले होते आणि तेंव्हा कोणीतरी अभ्यंकर काकांचा पत्ता दिला की ते  पेइंग गेस्ट ठेवतात म्हणून. मी त्यांना फोन केल्यावर ते म्हणाले जरूर राहायला ये, आम्ही वाट पाहतो आहे. सगळं सामान आवरुन  त्यांच्या कडे पोचायला मला त्या दिवशी रात्रीचे १० वाजले आणि खरंच  ते माझी वाट पाहत बाहेर उभे होते. आणि आल्या आल्या म्हणाले सामान नंतर नेऊन ठेव, आधी आमटी भात खायला ये. मी फक्त घळा  घळा रडायची बाकी राहिले होते. त्या क्षणी आमच्यातले घरमालक भाडेकरू नाते संपले आणि त्यांच्या अनेक मानस कन्यांमध्ये एकीची भर पडली.

आता माझे ऑफिस अगदीच जवळ झाले होते त्यामुळे सगळ्यात आधी मी घरी येत असे. आल्या आल्या काकांची हाक असायची, ये चहाला.  काकांकडे अफाट माहिती असे कुठल्याही विषयावर आणि ती रंजक करून सांगायची हातोटी. लंडन, पुणे, क्रिकेट, बी बी सी रेडिओ, पी जी. वूडहाऊस, पु. लं.  म्हणजे वीक पॉईंट. तिकडे राहूनही इकडच्या सगळ्या बातम्यांची खडा न खडा माहिती. प्रचंड प्रमाणात पुस्तक होती त्यांच्या घरी. मी खूप पुस्तक वाचली त्यांच्या कडे  .. विश्राम बेडेकरांचे  'एक झाड दोन पक्षी' अजूनही आठवते आहे.

क्रिकेट च्या वेडापायी १९५२-६० तिकिटाचे पैसे जमवून ते लंडन ला आले. त्याआधी ते केसरी मध्ये पत्रकार होते आणि इतर लिखाण हि करायचे. लंडन ला आल्यावर वेगवेगळ्या नोकऱ्या करून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्थिरावले. १९६४ साठी  सुलु मावशींशी लग्न झाले. ती पण कथा सुरस च म्हणावी लागेल.  दोघेही पुण्यात एकाच वाड्यात राहायचे आणि तिथेच प्रेम जमलेले. लग्न करायला भारतात परत येऊन पुन्हा दोघांची लंडन ला जायची तिकिटे काढण्या इतके पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी मावशींना तिकीट पाठवून बोलावून घेतले.  आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे 'लंडन च्या आजीबाई' न च्या घरी लग्न झाले.

त्यांचा स्नेही परिवार तर अफाट .. जवळपास सर्वच मराठी साहित्यिक, कवी, राजकारणी, गायक , संगीतकार , शात्रज्ञ ह्यांच्याशी त्यांचा अकृत्रिम स्नेह.  हि सगळी मंडळी त्यांच्याकडे कधी ना कधी राहून गेलेली. त्यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, फोटो तर असंख्य.  काका गेल्यावर मावशींची भेट झाली तेंव्हा त्या म्हणाल्या कि अगं मधुचे २ मोठ्या पेट्या भरून पत्र  आणि  फोटो आहेत. काय करावे त्याचे काळात नाही. एखाद्या अभ्यासकाला खूप काही मिळेल त्यातून. पण हे करणार कोण ! त्यांनी मला  पी. जी. वूडहाऊस  चे एक पत्र दाखवले होते. काकांच्या एका पत्राला त्यांनी उत्तर दिले होते कि मला भेटायला अमेरिकेत या. त्या पत्रावरची तारीख आणि वुडहाऊस चा वाढदिवस एकच होती . सोथबी ह्या लिलाव करणाऱ्या कंपनी च्या मते त्याला भरपूर किंमत आली असती !

परदेश प्रवास आता अपूर्वाई राहिली नाही आणि इतरांची त्याची वर्णन ऐकणे हे कंटाळवाणे आणि काहीवेळा थट्टेचा विषय होतो. माझ्या पहिल्या परदेश प्रवासाला यंदा २० वर्ष पूर्ण होतील आणि ज्यांच्या मुळे ते वास्तव्य  मर्मबंधातली ठेव झाली त्या अभ्यंकर काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.


Popular posts from this blog

सकाळची शोभा

बागकाम एक आनंद

प्रातःस्मरण