नील बट्टे सन्नाटा
आज खूप दिवसांनी एक खूप छान सिनेमा पहिला. आई मुलीच्या गोड नात्यावर आधारित. खरंतर तो प्रचारकी थाटाचा होऊ शकला असता पण तो अगदी शेवटचा थोडासा भाग आहे. खुसखुशीत संवाद, पात्रांचा सुंदर अभिनय आणि आपल्याला कधी ना कधी आलेले तसे अनुभव. एक मरमर काम करणारी मोलकरीण(बाई ) आणि तिच्या उडाणटप्पू लेकीची कथा. पण उगीच गरिबी, अन्याय, पैशामुळे नाकारले जाणे वगैरे मेलोड्रामा औषधाला पण नाही. आई चंदा आणि तिची मुलगी अपेक्षा उर्फ अप्पू ह्यांची हि कथा. अप्पू चे स्पष्ट (!) विचार .. इंजिनियर ची मुलं इंजिनिअर, डॉक्टर ची मुलं डॉक्टर तशी कामवाल्या बाई ची मुलगी कामवाली बाई. ती काय शिकून इंजिनिअर आणि डॉक्टर थोडीच होणार. अभ्यास करून करायचे काय .. आणि त्यातून ते गणित .. त्यात तर नील बट्टे सन्नाटा म्हणजे टोटल अंधार .. ओ म्हणता ठो कळत नाही. शाळेत जावे, मित्र मैत्रिणीन बरोबर दंगा मस्ती करावी आणि घरी परत यावे असे 'साधे' विचार. पण आई ला कुठे असं वाटतंय. तिची मुलीला खूप शिकवायची इच्छा. शाळेतल्या मास्तरांनी पण सगळी अशा सोडलेली. शेवटी आईच शाळेत विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेते आणि मुलीशी पैज लाव...